आषाढी वारीच्या अनुषंगाने पालखी सोहळा प्रमुखांच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी वारीपूर्वी करण्यात येणार

सर्व संबंधित यंत्रणांनी पालखी तळांवर मुरुमाचे साठे, रोलर व जेसीबीची व्यवस्था करून ठेवावी  

आषाढी वारीच्या अनुषंगाने पालखी सोहळा प्रमुखांच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी वारीपूर्वी करण्यात येणार

आषाढी वारीच्या अनुषंगाने पालखी सोहळा प्रमुखांच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी वारीपूर्वी करण्यात येणार
                                                                                               - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
 
 
 *सर्व संबंधित यंत्रणांनी पालखी तळांवर मुरुमाचे साठे, रोलर व जेसीबीची व्यवस्था करून ठेवावी
 
       पंढरपूर, दि. 26: - आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी होणार असून, आषाढी यात्रा सोहळ्याच्या अनुषंगाने यापुर्वी  पालखी मार्ग, तळ व रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पालखी सोहळा प्रमुखांकडून काही मागण्या व सूचना  करण्यात आलेल्या होत्या,  त्या सूचनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांकडून काही पालखी मार्ग व तळासंबंधी नवीन सूचना व मागण्या  प्राप्त झाल्या असून त्या सर्व मागणीची पूर्तता पालखी सोहळा जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
          आषाढी यात्रेच्या पुर्वतयारीबाबत केबीपी कॉलेज, पंढरपूर येथे दहा मानाच्या पालख्यांचे विश्वस्त, अध्यक्ष, सचिव  यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, सा.बां.अधिक्षक अभियंता संजय माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, प्रांताधिकारी सचिन इथापे, सदाशिव पडदुणे, विजया पांगारकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले,  कार्यकारी अभियंता अमित निमकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी  कार्यकारी अभियंता सोमशेखर हसापुरे,तहसिलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
              यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद म्हणाले, गतवर्षीच्या पालखी सोहळ्यासाठी पालखी मार्गावर, तळांवर  तसेच रिंगण सोहळ्याच्या  ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सोयीसुविधांबाबत पालखी सोहळा प्रमुखांनी समाधान व्यक्त केले. पालखी सोहळ्यासाठी अजूनही काही ठिकाणी सुधारणा करण्याची आवश्यकता असून, यंदा पाऊस जास्त होण्याची शक्यता असल्याने काही ठिकाणी वाढीव मुरमीकरण करण्याची आवश्यकता आहे.  पालखी तळ्याच्या सर्व ठिकाणी मुरमीकरण करण्यात येणार आहे. तसेच मुरुमाचे साठे ठेवण्यात येणार असल्याने  ऐन वेळेला ज्या ठिकाणी मुरमीकरण करण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी तात्काळ मुरमीकरण केले जाईल त्याचबरोबर त्याठिकाणी रोलर, जेसीबी मशीनची व्यवस्था देखील
करण्यात येणार आहे.
           तसेच आषाढी यात्रा कालावधीत गर्दी व्यवस्थापनाबरोबरच यावर्षी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने पावसामुळे कोणत्या प्रकारची आपत्ती येऊ शकते, तसेच कोणत्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता  आहे. या गोष्टी गृहीत धरून भाविकांच्या सुरक्षेसाठी  आपत्ती व्यवस्थापन आराखड्या अंतर्गत  व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात येईल. त्याचबरोबर आषाढी यात्रा सोहळा कालावधीत पालखी सोहळ्यासह वारकरी, भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता प्रशासनाडून घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी यावेळी सांगितले.
          यावेळी बैठकीत दहा मानाच्या पालख्यांचे विश्वस्त, अध्यक्ष, सचिव यांनी पालखी सोहळ्यासोबत दिवसेंदिवस दिंड्यांची संख्या वाढत असल्याने काही ठिकाणचे पालखीतळ कमी पडत असून ते तळ वाढवून मिळावेत. पालखी सोहळ्यासोबत महिलांसाठी पिंक टेन्ट व पिंक टॉयलेट उपलब्ध करून द्यावेत. पालखी सोहळ्याला आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा. टँकरची संख्या वाढवावी, पालखी सोहळे संबंधित मुक्कामाच्या ठिकाणावरून पुढे गेल्यानंतर तात्काळ स्वच्छता करावी, पालखी सोहळे पालखी मार्गावरून जात असताना वाहतुकीचे नियोजन व्हावे. पालखी तळांवर मुरमीकरण करावे.तसेच वाखरीचा तळ उत्कृष्ट मॉडेल तळ म्हणून विकसित करावा. सर्व पालखी सोहळे वाखरी येथे दाखल झाल्यानंतर सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्वागत कक्ष उभारले जातात. स्वागताचे कार्यक्रम घेतल्याने पालखी सोहळे पंढरपुरात दाखल होण्यास उशीर होतो यासाठी स्वागत कक्षांची संख्या कमी करावी जेणेकरून पालखी सोहळे लवकर पंढरपुरात दाखल होतील, अशा सूचना यावेळी केल्या.